छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून, त्यानंतर कोणतेही प्रचारकार्य करता येणार नाही, अशी माहिती महापालिका प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक रिंगणात एकूण ८५९ उमेदवार असून, सार्वजनिक ठिकाणी लावलेले पोस्टर्स, बॅनर्स तत्काळ काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी भरारी पथके सर्वत्र तैनात असून, त्यांची करडी नजर राहणार आहे.
महापालिकेच्या ११५ जागांसाठी २९ प्रभाग आहेत. यापैकी २८ प्रभागांतून प्रत्येकी चार सदस्य, तर २९ व्या प्रभागातून तीन सदस्य निवडले जाणार आहेत. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असून, एकूण ६ हजार ३८५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील २ हजार २४८ कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी अर्ज केले होते. त्यांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ‘सीएसएमएस वोटकर’ हा डेमो ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे. एका मतदाराला मतदानासाठी साधारण ७ ते ८ सेकंद लागतील, तर एकावेळी चार मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र सहायता केंद्रातून थेट प्रवेशाची सुविधा देण्यात आली आहे. काही प्रभागांमध्ये, विशेषतः प्रभाग क्रमांक ९ (ड) मध्ये चार ईव्हीएम लावण्यात येणार असल्याचेही श्रीकांत यांनी सांगितले.
मतदानासाठी एकूण ४ हजार १६२ ईव्हीएमचा वापर होणार असून, त्यासाठी १ हजार २६९ कंट्रोल युनिट उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. ईव्हीएम किंवा कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्यास त्वरित बदलाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या ४२ अतिसंवेदनशील मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, जिन्सी भागातील अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर ही संख्या १५ ते १८ ने वाढविण्यात येणार आहे. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त राहील.
सायंकाळी ५.३० वाजेनंतरही एखाद्या मतदान केंद्रावर मतदारांची रांग असल्यास शेवटच्या मतदाराचे मतदान होईपर्यंत प्रक्रिया सुरू राहील. त्यासाठी प्रकाश व अन्य आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, संबंधित ठिकाणी निवडणूक निरीक्षक ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह स्वतः उपस्थित राहणार असल्याचेही जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*