महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदार असलेल्या सर्व कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक काढत राज्यातील सर्व आस्थापनांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ही भरपगारी सुटी खासगी कंपन्या, दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेल आस्थापना यांसह सर्व प्रकारच्या आस्थापनांना लागू राहणार आहे. संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात नाव नोंद असलेला प्रत्येक कर्मचारी या सुटीचा लाभ घेऊ शकणार आहे. विशेष म्हणजे, कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अपवादात्मक परिस्थितीत जिथे पूर्ण दिवसाची सुटी देणे शक्य नसेल, तिथे कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान २ ते ३ तासांची विशेष सवलत देणे मालकांवर बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्याचा पगार कापला जाणार नाही, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. मतदानासाठी दिलेली सवलत किंवा सुटी ही कर्मचाऱ्याचा हक्क असून त्यास नकार देणे नियमबाह्य ठरणार आहे.

दरम्यान, एखाद्या आस्थापनाने सुटी किंवा सवलत नाकारल्यास कर्मचाऱ्यांनी तक्रार करावी, असे आवाहन कामगार उपायुक्त नितीन पाटणकर यांनी केले आहे. तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील कामगार उपायुक्त कार्यालयात ‘दक्षता कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. संबंधित कर्मचारी किंवा संघटनांनी ०२४०-२३३४६०३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होणार असून लोकशाही अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

620 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क