छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (१५ जानेवारी) मतदान होणार असून, यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरातील एकूण १,२६७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत ११ लाख १८ हजार २८३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
शहरात एकूण २९ प्रभाग असून, त्यापैकी १२ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार मतदान यंत्रे तर उर्वरित १३ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. दहा वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत असल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर एका केंद्राध्यक्षासह तीन मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राध्यक्षांकडे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, मेमरी, बॅटरी, मार्कर पेन, सील साहित्य व पितळी मोहर देण्यात येणार आहे. हे साहित्य ताब्यात घेतल्यानंतर केंद्राध्यक्ष व कर्मचारी नेमून दिलेल्या वाहनातून मतदान केंद्राकडे रवाना होतील. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर पोहोचतील.
मतदान प्रक्रिया सुलभ व आकर्षक करण्यासाठी आठ आदर्श मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये इंदिरानगर, बायजीपुरा, बेगमपुरा, कांचनवाडी, सिडको एन-११, किराडपुरा, सिडको एन-५ आणि मुकुंदवाडी येथील महापालिकेच्या शाळांचा समावेश आहे. या ठिकाणी वयोवृद्ध मतदारांसाठी बसण्याची व्यवस्था, स्तनदा मातांसाठी पाळणाघर तसेच लहान मुलांसाठी खेळण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी एकूण ५,५८८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यात १,३९७ केंद्राध्यक्ष आणि प्रत्येकी १,३९७ मतदान अधिकारी क्रमांक एक, दोन व तीन यांचा समावेश आहे. प्रशासनाकडून मतदान शांततेत व सुरळीत पार पडावे यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*