कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट शिवारात घडलेला खुनाचा अत्यंत क्लिष्ट गुन्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणात मृताची ओळख पटवून, आरोपी आई व मुलाला अटक करण्यात आली आहे.
दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी जामडी फॉरेस्ट गावालगतच्या वनभागात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्नड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. गावकऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर मृताची ओळख राजू रामचंद्र पवार (रा. जामडी, ता. कन्नड) अशी पटली. याप्रकरणी मृताचा नातेवाईक प्रकाश पवार यांच्या फिर्यादीवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळाच्या परिसरात सखोल तपास केला. मृताच्या कपड्यांचे तुकडे, फुटलेला मोबाईल आणि चप्पल वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने तपासाला दिशा मिळाली.
तांत्रिक माहिती आणि गोपनीय तपासातून संशय शेजारील शेतमालकाच्या कुटुंबाकडे वळला. सखोल चौकशीनंतर वंदना राजू पवार (वय 45) आणि तिचा मुलगा धीरज उर्फ टेमा पवार (वय 18) यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृत व्यक्ती वारंवार त्रास देत असल्याने दोघांनी मिळून त्याचा खून केल्याचे त्यांनी मान्य केले. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात लपवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
सतत आठ दिवस चाललेल्या अथक तपासातून हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*