छत्रपती संभाजीनगर : शहरात सातत्याने होत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा अखेर पर्दाफाश झाला असून, एमआयडीसी सिडको पोलिसांनी एका शातीर चोराला रंगेहाथ अटक केली आहे. स्वतःची दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्याच चावीने स्विच खराब असलेल्या अन्य दुचाकी सुरू होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेख फारुक शेख इस्माईल (वय ४८, व्यवसाय – बांधकाम साइट सुपरवायझर) याने दुचाकी चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे तपासात उघड झाले आहे.
प्रोझोन मॉल, एमजीएम कॅम्पस, जिल्हा न्यायालय परिसरातून वारंवार दुचाकी चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. सहायक निरीक्षक भरत पाचोळे व उपनिरीक्षक संजू काळे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. १९ जानेवारी रोजी सीपेट महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये साध्या वेशात गस्त घालत असताना चोरीच्या फुटेजमधील वेशभूषा व बुटांशी साधर्म्य असलेला संशयित आढळून आला. त्याच्याकडील दुचाकीची तपासणी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
पोलिस चौकशीत शेख फारुकने गेल्या आठ महिन्यांत एमजीएम रुग्णालय, जिल्हा न्यायालय, प्रोझोन मॉल परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. दोन दिवसांच्या तपासात पोलिसांनी त्याच्याकडून १५ दुचाकी जप्त केल्या असून, या दुचाकी त्याने नारेगाव परिसरात १० ते २० हजार रुपयांत विकल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, तो केवळ लाल रंगाच्या दुचाकीच चोरी करत होता.
आर्थिक अडचणी व कर्जबाजारीपणा हे चोरीमागील प्रमुख कारण असल्याचेही तपासात समोर आले आहे. २०२२ मध्ये काकांचे निधन झाल्यानंतर नोकरी गेली आणि प्लॉट व्यवहारात तो कर्जात बुडाला. पुढील तपासात आणखी दुचाकी सापडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या कारवाईत अंमलदार संतोष सोनवणे, संजय नंद, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड, परशुराम सोनुने, अरविंद पुरी व रतन नागलोत यांनी सहभाग घेतला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*