छत्रपती संभाजीनगर : बँकेच्या नावे व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या एपीके फाईलद्वारे मोबाईलचा ताबा घेत सायबर गुन्हेगारांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल दोन लाख रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, सायबर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे ही रक्कम वेळेत वाचवण्यात यश आले आहे.
महावितरणमध्ये कार्यरत असलेले सीताराम राठोड यांना १७ जानेवारी रोजी मोबाईलवर एक कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवत तुमच्या क्रेडिट कार्डचा विमा काढायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर एसबीआय बँकेच्या नावे एक एपीके फाईल व्हॉट्सअॅपवर पाठवून ती इन्स्टॉल करण्यास सांगितले. विश्वास ठेवून राठोड यांनी ती फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली.
फाईल इन्स्टॉल केल्यानंतर काही तासांतच सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा घेतला. त्यानंतर चार टप्प्यांत क्रेडिट कार्डद्वारे त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये काढण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राठोड यांनी तातडीने सायबर पोलिस ठाणे (ग्रामीण) येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पैसे ज्या बँक खात्यात गेले, त्या खात्याचा तसेच पुढील सर्व आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यात आला. तपासात हे पैसे आंध्र प्रदेशातील एका बँक खात्यातून तेलंगणातील एका राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन पोर्टलवर मोठ्या खरेदीसाठी वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
ऑर्डर पाठवण्याच्या काही तास आधीच सायबर पोलिसांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधला. अधिकृत ई-मेलद्वारे ही ऑर्डर सायबर गुन्ह्यातील पैशांतून दिली गेल्याची माहिती देत व्यवहार थांबवण्यात आला. त्यामुळे तक्रारदाराचे संपूर्ण दोन लाख रुपये वाचवणे शक्य झाले.
या यशस्वी कारवाईनंतर सीताराम राठोड यांनी पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेऊन सायबर पोलिसांच्या तत्परता व कार्यक्षमतेबद्दल आभार मानले. दरम्यान, नागरिकांनी अशा प्रकारच्या एपीके फाईल्स, संशयास्पद कॉल्स आणि लिंकपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*