छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत आधुनिकतेची नवी भर पडत असून ‘राजमाता जिजाऊ’ ही अत्याधुनिक स्मार्ट बस सेवा आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि ‘यशवंती’ या गौरवशाली सेवांच्या परंपरेत ही नवी सेवा सामील झाल्याने प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाला एकूण १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक संतोष घाणे यांनी दिली.
या बसची रचना अत्याधुनिक असून त्यामध्ये ३२ आसन व्यवस्था आणि एकूण ५६ प्रवाशांची क्षमता आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रत्येक बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच जीपीएस प्रणालीमुळे बसचे अचूक लोकेशन ट्रॅक करता येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी पॅनिक बटनची सुविधाही देण्यात आली आहे. प्रवाशांना योग्य माहिती मिळावी यासाठी पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक बसवण्यात आले आहेत.
ही बससेवा विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर शटल सेवेसाठी चालवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. एसटी महामंडळ खासगी वाहतूक व्यवस्थेशी स्पर्धा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असून या नव्या सेवेमुळे प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवन परिसरात करण्यात आले. राज्यभर सुमारे ३००० अत्याधुनिक बस टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा महामंडळाचा मानस असून, यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी होणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E8LjDsy4JpoKzFHBA67enK?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*