छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी अर्ज दाखल करण्याची आज (३० मार्च) अंतिम मुदत असून, इच्छुकांची मोठी धावपळ सुरू आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मनपा नगर सचिव कार्यालयात अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने शेवटच्या क्षणी अनेक इच्छुक अर्ज दाखल करताना दिसत आहेत.
महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असून, यासाठी २५ मार्चपर्यंत अर्ज वाटप करण्यात आले होते. या कालावधीत सुमारे पावणे दोनशे इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे अंतिम दिवशी अर्ज सादर करणाऱ्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वीकृत नगरसेवक म्हणून सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, वकील, डॉक्टर तसेच सेवानिवृत्त आयएएस अधिकारी यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.
महापालिकेतील एकूण ११५ नगरसेवकांच्या संख्येच्या आधारावर १० स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. ११.५ या सूत्रानुसार राजकीय पक्षांना स्वीकृत नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार भाजपला ५, एमआयएमला ३, तर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना (उबाठा) गटाला प्रत्येकी १ नगरसेवक निवडण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, सर्व अर्जांची छाननी १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मनपा आयुक्तांच्या दालनात करण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे आजचा दिवस इच्छुकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*