छत्रपती संभाजीनगर : वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १७ वर्षीय तरुणाचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.३१) मांडकी शिवार परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साईनाथ शिवाजी तुपे (रा. ब्रीजवाडी, चिकलठाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी साईनाथचा वाढदिवस असल्याने तो अत्यंत आनंदात होता. दुपारच्या सुमारास तो आपल्या सहा मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता.
यानंतर सर्व मित्र मांडकी (नारेगाव रोड) परिसरातील एका खदानीवर पोहण्यासाठी गेले. साईनाथला पोहता येत नसतानाही त्याने थर्माकॉल शीटच्या साहाय्याने पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक शीटवरचा ताबा सुटल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला. पाण्याची खोली लक्षात न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला.
मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन अधिकारी विनायक कदम, ड्यूटी अधिकारी हरिभाऊ घुगे व वैभव बाकडे यांच्या पथकाने अवघ्या १५ मिनिटांत साईनाथला पाण्याबाहेर काढले.
मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. चिकलठाणा पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी याबाबत माहिती दिली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*