छत्रपती संभाजीनगर : शहरातील बारापुल्ला गेट परिसरात आज दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. महानगरपालिकेच्या भरधाव कचरा गाडीने एका २० वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ओमकार खनसे (वय २०, रा. बजाज नगर) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार हा शहरातील एसबी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास तो बारापुल्ला गेट परिसरातून जात असताना हा अपघात घडला. मनपाच्या कचरा गाडीने त्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ओमकारला बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ऐन तारुण्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे खनसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बजाज नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला.

दरम्यान, पोलिसांनी कचरा गाडीच्या चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. शहरात कचरा गाड्यांच्या वाढत्या वेगावर आणि निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,700 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क