छत्रपती संभाजीनगर : आर्थिक अडचणी आणि कुटुंबातील गंभीर आजारपणामुळे मानसिक तणावात असलेल्या २८ वर्षीय तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी परिसरात घडली. मंगळवारी (दि.३१) रात्री दहाच्या सुमारास गॅस सिलिंडरचा पाइप काढून लायटरने आग लावण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत त्याचा जीव वाचवला.
सदर तरुण गेल्या पाच वर्षांपासून परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता, तसेच व्हिसा नूतनीकरणासाठी लागणारा मोठा खर्च यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. याचदरम्यान त्याच्या लहान भावावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यासाठी दरमहा लाखो रुपयांचा खर्च येत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने भावाला जनरल वॉर्डमध्ये हलवण्याची चर्चा कुटुंबात सुरू होती. मात्र, भावाला उत्तम उपचार मिळावेत यासाठी तो ठाम होता. या कारणावरून घरात वाद झाले आणि हतबल झालेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडीचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले आणि संजय बिमरोट यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तरुण हातात लायटर घेऊन बसलेला होता. पोलिसांनी अत्यंत संयमाने संवाद साधत त्याला शांत केले आणि त्याचा जीव वाचवण्यात यश मिळवले.
यानंतर तरुणाला पोलिस ठाण्यात नेण्यात आले, जिथे डॉ. संदीप सिसोदे यांनी त्याचे समुपदेशन केले. “आयुष्य मौल्यवान आहे, संकटांना सामोरे जायचे असते,” असा सल्ला देत त्याचे मनोबल वाढवण्यात आले. त्यानंतर तरुणाने पुन्हा असे पाऊल उचलणार नाही, अशी ग्वाही दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*