छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात गॅस चोरीच्या वाढत्या प्रकारांवर राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठा घाव घातला आहे. गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गॅस चोरी करणारे आंतरराज्य रॅकेट उघडकीस आले असून, तब्बल १ कोटी २६ लाख रुपयांचा LPG साठा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई एखाद्या चित्रपटातील थरारक प्रसंगासारखी घडली. नियंत्रक शिधावाटप अधिकारी चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथक प्रमुख गणेश बेल्लाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वैजापूर रोडवरील हॉटेल साईयश परिसरात सापळा रचला. २ एप्रिलच्या रात्री अंधाराचा फायदा घेत एचपी कंपनीच्या टँकरचे सील तोडून गॅस चोरी सुरू असतानाच पथकाने अचानक धाड टाकली आणि दोन आरोपींना रंगेहात पकडले.

कारवाईत दोन कॅप्सूल टँकर जप्त करण्यात आले. या टँकरमध्ये एकूण ३५,२२० किलो LPG गॅस होता. याशिवाय १९.२ किलो व १४.२ किलो क्षमतेचे एकूण २६ सिलेंडरही आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे १ कोटी २६ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे, जप्त करण्यात आलेला गॅस साठा तब्बल २,४८० कुटुंबांच्या महिनाभराच्या गरजेसाठी पुरेसा होता. म्हणजेच गॅस माफिया स्वतःच्या नफ्यासाठी सर्वसामान्यांच्या हक्काच्या इंधनावर डल्ला मारत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेनंतर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटचे जाळे किती दूरपर्यंत पसरले आहे, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, “गॅस चोरी आणि अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार,” असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

521 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क