छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील देवगाव राज्य मार्ग क्र. ३९ वर गुरुवारी (दि. २) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भाऊसाहेब किसनराव शेजूळ (वय ५५, रा. वैरागड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते गुरुवारी सकाळी आपल्या १७ वर्षीय मुलगी शिवानीला क्लासला सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यानंतर हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात नारळ अर्पण करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, वळई नदीच्या पुलाजवळ सुरू असलेल्या रस्ते कामामुळे त्यांचा प्रवासच अखेरचा ठरला.

घटनास्थळी रस्ते काम सुरू असल्याने परिस्थिती धोकादायक बनली होती. त्याचवेळी एक मिक्सर मशीन रिव्हर्स घेत होते. चालकाने कानात हेडफोन लावलेले होते आणि वाहनाला मागील आरसाही नव्हता. त्यामुळे मागे काय घडत आहे, याची त्याला कल्पनाच आली नाही. निष्काळजीपणे घेतलेल्या रिव्हर्समध्ये मिक्सरने दुचाकीसह बाप-लेकीला तब्बल ५० फूट फरफटत नेले.

या भीषण अपघातात भाऊसाहेब शेजूळ यांचा जागीच मृत्यू झाला, तर शिवानी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकी पूर्णपणे चिरडलेली आढळली.

भाऊसाहेब शेजूळ हे मेहनती दूध उत्पादक शेतकरी होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून रस्ते कामातील निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या अभावामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप केला आहे. संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

597 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क