छत्रपती संभाजीनगर : शहरातील एमजीएम रुग्णालयात डॉक्टरांवर हल्ल्याच्या दोन गंभीर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांच्या उपचारादरम्यान नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये झालेला वाद टोकाला जाऊन दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली असून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना २८ एप्रिल रोजी घडली. डॉ. मित पटेल हे प्रसूती व स्त्रीरोग विभागात कर्तव्य बजावत असताना एका २६ वर्षीय महिला रुग्णाच्या पती आणि सासूने त्यांच्याशी वाद घातला. “रुग्णाची नीट काळजी घेतली नाही,” असा आरोप करत त्यांनी डॉक्टरांना नाव विचारत आरडाओरड सुरू केली. त्यानंतर शिवीगाळ करत डॉक्टर पटेल यांना मारहाण करण्यात आली. छाती, पाठ आणि चेहऱ्यावर थपडा मारून त्यांना जखमी करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हुम्पापुरा रंगस्वामी राघवन यांच्या तक्रारीवरून १ मे रोजी रुग्णाचा पती अलमास फातिमा शेख अब्दुल नदीम, तसेच त्याचे नातेवाईक आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अंमलदार शिवाजी भोसले करत आहेत.

दरम्यान, दुसरी घटना २९ एप्रिल रोजी आपत्कालीन विभागात घडली. निवासी डॉक्टर सय्यद मुस्तफिजुर हे ड्युटीवर असताना खासगी रुग्णालयातून आणलेल्या रुग्णाची तपासणी करत होते. हृदयविकाराचा संशय आल्याने त्यांनी ईसीजी काढला. मात्र, नातेवाईकांनी यावर आक्षेप घेत “ईसीजी का काढताय, थेट आयसीयूमध्ये घ्या,” असा गोंधळ घातला. वाद वाढत जाऊन त्यांनी डॉक्टरांवर हल्ला चढवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या घटनेप्रकरणी मृत रुग्णाचे नातेवाईक समीर शेख, त्याचे वडील आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार भाऊसाहेब जगताप या प्रकरणाचा तपास करत आहेत. सलग दोन दिवसांत घडलेल्या या घटनांमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,162 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क