छत्रपती संभाजीनगर शहरातील :  सिल्कमिल कॉलनी परिसरात घराच्या मालकी हक्काच्या वादातून मुलानेच वडिलांची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (११ जून) रात्री घडली. या हल्ल्यात जाफर कमरुद्दीन सय्यद पटेल (८२, सध्या रा. पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी आरोपी मुलगा अब्दुल रहेमान अब्दुल जाफर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

माहितीनुसार, जाफर पटेल आणि त्यांचा मुलगा अब्दुल रहेमान यांच्यात घराच्या मालकी हक्कावरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नुकताच निकाल जाफर पटेल यांच्या बाजूने लागला होता. त्यानुसार गुरुवारी तहसीलदार आणि सातारा पोलिसांच्या उपस्थितीत संबंधित घराचा ताबा त्यांना देण्यात आला. ताबा मिळाल्यानंतर जाफर पटेल आणि त्यांची मुलगी पुण्याकडे परतण्याच्या तयारीत होते.

दरम्यान, आरोपी मुलाने घराचे कुलूप तोडले असावे, असा संशय व्यक्त झाल्याने जाफर पटेल पुन्हा घराची पाहणी करण्यासाठी गेले. कुलूप व्यवस्थित असल्याची खात्री करून ते परतत असताना आरोपीने त्यांचा रिक्षा अडवून चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीने वडिलांच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर आणि हातावर तब्बल आठ वार केले. वडिलांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या बहिणीवरही आरोपीने पाच वार केले. तिच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत त्याला मिटमिटा परिसरातील मेहुण्याच्या घरातून ताब्यात घेतले. आरोपीने झोपेच्या गोळ्या घेतल्याचा संशय असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जाफर पटेल हे जलसंपदा विभागातून निवृत्त झाले होते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आरोपी मुलगा वारंवार घरात वाद घालत होता. त्याच्यावर यापूर्वी कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हेही दाखल आहेत. न्यायालयीन लढाईनंतर घराचा ताबा मिळाल्याच्या काही तासांतच घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,911 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क