संभाजीनगरच्या २६ वर्षीय डॉ. प्रतीक्षाला आई व्हायचं होतं. गोंडस बाळ हवं होतं. संशयी डॉक्टर नवऱ्याच्या अतोनात छळामुळे तिने शनिवारी जीव दिला. रविवारी तिची ७ पानांची सुसाइड नोट मिळाली. जो नवरा भयंकर छळत होता त्याच्यावर तिने कविताही केली. नवऱ्यावर प्रेम एवढे होते की ती लिहून गेली….. ‘गोड आहात दिसायला, गोडच राहा… आणि कधी माझ्यावर थोडं पण प्रेम केलं असेल तर मला गच्च मिठी मारूनच चितेवर ठेवा… बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा…’
डॉ. प्रतीक्षाच्या मृत्यूनंतर कुणी मेणबत्ती मोर्चा काढून निषेध करणार नाही अथवा कुणीही कोणाच्याही फाशीची मागणी करणार नाही. परंतु ही चिठ्ठी वाचून तुमच्या डोळ्यांत अश्रू तरळल्यास त्यांना थांबवू नका… सिडको पोलिसांनी रविवारी डॉ. प्रीतमवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. प्रीतम फरार आहे. प्रतीक्षा लिहून गेली, माझा न्याय मी स्वतः घेईल स्वामींकडून… प्रतीक्षाची सुसाईड नोट जशीच्या तशी.
डियर अहो,
खूप प्रेम केलं हो तुमच्यावर. जिवापाड केलं. स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन देऊन मंद करून टाकलं. एका स्वावलंबी, अॅम्बिशियस मुलीला डिपेंडेंट बनवलं तुम्ही. खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील. काळजी करतील. करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा लागत होता नं. त्याचीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं. आज ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती तर. तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं मी. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आई-वडिलांशी, भावाशी बोललल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांनाही नव्हते बोलत जास्त. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाइल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले. त्यासाठी पण तयार झाले. पण तुमचे ‘डाऊट’ काही संपतच नाही. सतत माझ्या ‘कॅरेक्टर’वर संशय घेतात. पण, देवाशपथ सांगते की, मी तुमच्याशी प्रामाणिक होते, आहे अन् राहील.
माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही. माझे जे आहे ते तुम्हीच आहात. तुमच्या बायकोची जागा भेटली, पण तुमच्या हृदयात मला कधीच जागा नाही दिली तुम्ही. मी खूप हळवी आहे, हेच विसरलात. असं म्हणतात चारित्र्य महिलेचा सर्वात मोठा दागिना असतो. आणि तुम्ही नेहमीच त्यावर चिखल फेकला. सतत संशय-संशय. मी खूप वैतागले होते. लग्नापासून मी तुमच्या अशा वागण्याने डिप्रेशनमध्ये गेले. म्हणून सतत मला आपोआप रडू यायचे. पण तुम्हाला मी रडकी वाटायचे. आणि खरं तुमचं प्रेम तुमच्या आयुष्यातून गेल्यापासून आणि मी आल्यापासून तुमचा बॅडलकच सुरू झाला. आज त्यातून तुमची सुटका होईल. मी तुम्हाला लावलेला जीव, तुमच्यावर केलेला विश्वास आणि प्रेम सगळं अगदी खरं आणि जेन्यून होतं. पण तुमचे येणारे असंख्य कॉल्स मला स्टेबल राहू देत नाही. ना माझ्या कामात मन लागतं ना घरात. मला तुम्ही फोनवर इतकं रडवता, विचारही करत नाही की ही हॉस्पिटलला असेल. आजूबाजूला लोक असतील. माझ्या इज्जतीशी तुम्हाला घेणंदेणंच नाही. कामात असताना किंवा फोन बिझी असताना कंटिन्यू कॉल करत मला जाब विचारला जातो. माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल करणार होतो. आता तुला पाहायला असं सांगतात. म्हणजे, माझ्यावर तुमचा किती अविश्वास आहे हे लगेच दिसते मी कामाच्या ठिकाणीसुद्धा धाकात असते. सतत कुठे आहेस..? काय करते..? एवढा वेळ का झाला? कॉल नाही केला? बोलायचं नाही का..? असं बोलून त्रास दिला. माहेरवाल्यांना काही पण बोलतात. फर्निचरच्या पैशाहून भांडतात. जेव्हा मला ‘नीट-पीजी’ द्यायची होती तेव्हा अभ्यास करू दिला नाही. स्वतः ही केला नाही. मी केलेल्या चुका मला रोज ऐकवून माझी मेंटली हरॅशमेंट केली तुम्ही. कामात असताना कॉल उचलला नाही म्हणून मला रागावतात. नंतर बोलते म्हटल्यावर पण चिडतात. हे स्वतः आज समाधान भाऊसमोर झालं. मला दिलेला त्रास घरी सांगितला तर बघ आपलं नातं तुटेल, या धमकीनं मला नेहमी शांत बसवलं. माझ्याकडून आता सहन होत नाही हो. एवढा जीव लावून, तुमच्या घरच्यांना जीव लावून तुम्ही माझ्याविषयी त्यांच्या मनात खूप वाईट गोष्टी पेरल्या. मी त्यांना मनापासून जपलं. सासू-सासऱ्यांची काळजी घेतली. कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असं म्हटलं. मला ते फार वाईट वाटलं. म्हणून मी देवाला जाताना मम्मी-पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं, पण मी कंट्रोल केलं. माझ्यात आणि प्रिया दीदीत वाद घालून दिले. माझा मोबाइल तुमच्यासाठी नेहमी ओपन राहिला. तुमचे फिंगर प्रिंट त्याला जोडले आहे. तुमच्यावर मी लग्नाआधी पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातले पैसे आई-वडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. त्यावर तुमचा काहीच अधिकार नव्हता. तो पैसा मी माझ्या कष्टानं आणि आई-वडिलांच्या साथीनं कमावला. मला खूप मोठी ‘गायनाकॉलॉजिस्ट’ व्हायचं होतं, पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी मी एवढंच म्हणेन – माझ्या आई-वडिलांना मी नसेल. तरी कुणाल आहे. तुम्ही एकटे आहात. त्यांना (सासू- सासऱ्यांना) नीट सांभाळा. त्यांच्यावर चीडचीड नका करत जाऊ.
आय लव्ह यू सो मच, बाय… यू आर फ्री बर्ड नाऊ.’ मी मेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर व हुंडा देणारी बायको भेटेल. घराला सून भेटेल. पण माझ्या मम्मी- पप्पाला मुलगी आणि भावाला बहीण नाही भेटणार. पस्तावा करू नका. खुशीनं जगा, तुमची डोकेदुखी नेहमीसाठी जाते.
बाय अहो, आय विल मिस यू अलॉट. माझी कदर केली नाही, दुसऱ्या बायकोची करा अन् सुखी राहा. माझी मम्मी-पप्पा आणि कुणाल तुम्हाला तर आयडिया पण नाही, मी असा निर्णय घेईल. पण तुम्हाला दिसला न मला दिलेला त्रास. सॉरी मम्मी-पप्पा, सॉरी कुणाल. पण नाही जगावं वाटत रे असं चारित्र्याचा धब्बा घेऊन. माझं कॅरेक्टर एकदम प्युअर आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि हा पप्पा, हे त्यांच्या पोराला वाचवण्यासाठी खूप राजकीय दबाव टाकतील. कलेक्टर जावयाची मदत घेतील. तुम्ही लढू नका, तुम्ही फक्त खुशीनं जगा, माझा न्याय मी स्वतः घेईल स्वामींकडून. एकमेकांना सांभाळा, कुणालचं लग्न मस्त करा. मी असेल तुमच्यासोबत नेहमी. संतोषभाऊ व गजूभाऊ मम्मी-पप्पाकडं लक्ष द्या. तुम्ही दोघे सख्ख्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. थैंक्यू लव्ह यू ऑल. मला माफ करा. आय विल मिस यू ऑल. मामांना, मामींना, आत्या-मामांना, गाढवे परिवाराला माझा मोठा थैंक्यू. सगळ्यांनी खूप जीव लावला. मी तुमची मुलगीच होते आधीपासून. मुलीच्या चितेवर शांतीसाठी प्रार्थना करा. स्वामी मला माफ करा.श्री स्वामी समर्थ,
तुमची लाडकी पतू.
प्रतीक्षाने सुसाइड नोटमध्ये लिहिलेली कविता
तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री…
“माझ्या मनीचे दुःख सारे कधी तू जाणलेच नाही
पावसात लपणारे अश्रू माझे कधी तुला दिसलेच नाही…
तुझ्यासाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तू पाहिले नाही.
तुझ्यासाठी झटणाऱ्या हातांना चुंबले नाही..
नशीब बांधले होते आपले, नाही त्यात षड्यंत्र काही
दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही.
मनीचे भाव, मनाचे घाव याला काही महत्त्व नाही. तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री, आणखी काही नाही..
तुझ्यापासून सुख माझे, तुझ्यासाठी सर्व काही मी स्वत:ला हरवून आले याचे मला दुःख नाही..
तू फक्त मला जपावे मला यापेक्षा अपेक्षा नाही.
तुझ्यासाठी मी सगळं करेल यात काही शंका नाही..
तुझ्याशी भांडता-भांडता तुझ्यात किती गुंतले कळलेच नाही.
तुझ्या प्रेमात पडताना मी
स्वतःला कधी रोखले नाही.”
अहो, तुमच्या ओव्हरपजेसिव्हनेस आणि डॉमिनेटिंग नेचरमुळे मला खूप त्रास झालाआहे. माणसाने एवढं डॉमिनेटिंग नसावं. मी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल, पण प्रायव्हेट प्रॉपर्टीला जपावं पण लागतं हे विसरून गेलात. तुमच्यापासून दूर जायची बिलकूल इच्छा नाही. तुमच्यासोबत जगायचं होतं मला, पण आपल्यात लग्नापासून काहीच जमलं नाही. मला कधी समजून घेतलं नाही, मला फक्त रेस्ट्रिक्शन्समध्ये ठेवलं. याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवते… ‘गोड आहात दिसायला, गोडच राहा… आणि कधी माझ्यावर थोडं पण प्रेम केलं असेल तर मला गच्च मिठी मारूनच चितेवर ठेवा… बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा…’
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*