छत्रपती संभाजीनगर :  शहरात दागिन्यांच्या चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून एका दिवसात तब्बल चार वेगवेगळ्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, वर्दळीच्या ठिकाणांपासून ते रिक्षा, बस प्रवास आणि गर्दीच्या कार्यक्रमांपर्यंत सर्वच ठिकाणी महिलांना टार्गेट केले जात असल्याचे दिसून येत आहे. सोन्याचे दर गगनाला भिडल्याने अशा गुन्ह्यांत वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पहिल्या घटनेत, सावरकर चौक येथून रिक्षात प्रवास करणाऱ्या आरती राळेगणकर (वय ६३) या वकील महिलेला चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटल्याने त्यांनी ते सुरक्षिततेसाठी पिशवीत ठेवले होते. मात्र प्रवास संपल्यानंतर पिशवीतून १२ ग्रॅमचे मंगळसूत्र गायब झाल्याचे लक्षात आले. रिक्षात सोबत असलेल्या गरोदर महिलेसह इतरांनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत, नाजीया बेगम (वय ३५) या त्यांच्या जाऊसोबत सिटी चौक भागात खरेदीसाठी गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या पर्सवर डल्ला मारला. हातगाडीवरून खरेदी केल्यानंतर पैसे देताना त्यांच्या पर्समधून ७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ९०० रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे उघड झाले.

तिसऱ्या घटनेत, जबिंदा मैदानावर प्रवचनासाठी आलेल्या दोन महिलांना गर्दीचा फटका बसला. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत सुनीता सोनगिरे यांचे दोन तोळ्यांचे मिनी गंठण आणि शोभा आडेकर यांचे १४ ग्रॅमचे मनी मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चौथ्या घटनेत, सिडको बस स्थानकावर एका कुटुंबाची बॅग चोरट्यांनी साफ केली. रामदास तायडे हे कुटुंबासह लग्नासाठी जात असताना त्यांच्या बॅगेतून ९ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि १० ग्रॅमचा नेकलेस चोरीला गेला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या सलग घटनांमुळे महिलांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असून, गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने उघडपणे न घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

255 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क