छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन एमआयडीसी परिसरात मंगळवारी पहाटे दोन तरुणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. गणेश झिरपे (वय २३, रा. सूर्य उद्योग नगर, बिडकीन) आणि सचिन आरगडे (वय २९, रा. धनगर पिंपरी, जि. जालना) अशी मृतांची नावे असून, दोघे जिवलग मित्र होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी गणेश झिरपे याने आपल्या आईला “मी जीवन संपवत आहे” असा मेसेज पाठवला होता. तसेच व्हॉट्सअॅपवरही त्याने तसेच स्टेटस ठेवले होते. त्यानंतर दोघांनी दोन पाण्याच्या बाटल्या, दोन विदेशी दारूच्या बाटल्या आणि विषारी औषधाचा डबा सोबत घेतला. एकाच मोटारसायकलवरून ते डीएमआयसी परिसरात गेले आणि तिथे विष प्राशन करून आपले जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. दोघांचे मृतदेह पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात दोघेही हॉटेलमध्ये काम करणारे असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, गणेश झिरपे यांची आई लग्नसोहळ्यांमध्ये केटरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. मुलाच्या अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे, सचिन आरगडे यांच्या कुटुंबीयांवरही शोककळा पसरली आहे.

दोघांनी आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, बिडकीन पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,473 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क