छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यग्र असताना एक अजब प्रकार समोर आला आहे. लॉकअपमध्ये असलेल्या एका आरोपीने भूक लागल्याचे कारण देत थेट पोलीस ठाण्यातून बाहेर पडत घरी जाऊन जेवण केले आणि निवांत झोप काढली. काही वेळानंतर पोलिसांनीच त्याला पुन्हा अंथरुणातून उचलत कोठडीत आणल्याने या घटनेची शहरभर चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलच्या रात्री मुकुंदवाडी परिसरात एका प्रवाशाला लुटल्याप्रकरणी अभिषेक उर्फ भय्या भूमकर (२१) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्याच्यासोबत सोमीनाथ उर्फ सोनू नरोडे (२३) यालाही ताब्यात घेण्यात आले होते. दोघांकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, घटनेच्या वेळी अभिषेक हा नशेत असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, रविवारी शहरात व्हीआयपी दौरा असल्याने बहुतांश पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यामुळे पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात कर्मचारीसंख्या कमी होती. याचाच फायदा घेत अभिषेकने लॉकअपमधून शांतपणे बाहेर पडण्याची संधी साधली. नशा उतरल्यावर त्याला भूक लागल्याने तो थेट मुकुंदवाडीतील आपल्या घरी पोहोचला. तेथे त्याने पोटभर जेवण केले आणि निर्धास्तपणे झोपला.
काही वेळानंतर आरोपी गायब असल्याचे लक्षात येताच पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. तात्काळ शोधमोहीम राबवण्यात आली. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घरी धाव घेतली असता, अभिषेक घरात निवांत झोपलेला आढळला. पोलिसांनी त्याला जागे करून पुन्हा ताब्यात घेतले. या विचित्र प्रकारामुळे पोलीस ठाण्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील चौकशी सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*