छत्रपती संभाजीनगर : डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना फसवणुकीचे नवे प्रकारही समोर येत आहेत. अशाच एका बनावट यूपीआय अॅपच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी योगेश विनायक गव्हाणे (३५, रा. कमळापूर, वाळूज), नितीन अनिल मुसमाडे (३३, रा. कमळापूर) आणि रवी सुभाष राठोड (३४, रा. बजाजनगर) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश गव्हाणे हा वाळूज परिसरात वेल्डिंगचे दुकान चालवतो. कामासाठी लागणाऱ्या ‘सीओ-टू’च्या खर्चापासून बचाव करण्यासाठी त्याने बनावट यूपीआय अॅपचा वापर करून व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याचा डाव आखला. त्यासाठी त्याने आपल्या दुकानातील दोन कामगारांची मदत घेतली. या तिघांनी मिळून बनावट अॅपच्या सहाय्याने सुमारे ३७ हजार रुपयांचे सीओ-टू मशीन खरेदी केले. दोन ठिकाणी त्यांनी यशस्वीरित्या फसवणूक केली.

मात्र, एका व्यापाऱ्याने पेमेंटची खात्री झाल्यानंतरच माल देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरोपींचा डाव उघडकीस आला. या माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक कदीर देशमुख व उपनिरीक्षक अर्जुन कदम यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली.

तपासात समोर आले की, आरोपींनी व्हीपीएनच्या माध्यमातून बंदी असलेले बनावट यूपीआय अॅप डाउनलोड केले होते. या अॅपमध्ये व्यवहार पूर्ण झाल्याचा खोटा हिरवा मेसेज दिसतो; मात्र प्रत्यक्षात पैसे खात्यात जमा होत नाहीत.

पोलिसांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे की, केवळ ग्राहकाने दाखवलेल्या स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवू नये. ‘साउंडबॉक्स’ किंवा स्वतःच्या बँक खात्यात व्यवहार जमा झाल्याची खात्री करूनच माल द्यावा, अन्यथा अशा फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

772 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क