मुंबई : दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण तापले असून त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. या घटनेचा निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी समविचारी पक्ष, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बलप्रयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेवरून केंद्र सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली असून विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांचे नेते दिल्लीत दाखल होत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आंदोलनग्रस्तांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत, नागरिकांवर बलप्रयोग करणे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी यापूर्वी शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचाही उल्लेख करत सरकारवर टीका केली.
याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे विविध आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. रिमझिम पावसातही आंदोलकांनी आंदोलन सुरू ठेवत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि पोलिस कारवाईची चौकशी व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, २३ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला विविध संघटना आणि राजकीय पक्षांचा कितपत प्रतिसाद मिळतो, तसेच जनजीवनावर त्याचा काय परिणाम होतो, याकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतही उमटत असून, या घडामोडींमुळे पुढील काही दिवस राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*