छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने शहरातील एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर धडक कारवाई करत भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत ₹३ लाख १२ हजार ३८० किमतीचा तब्बल ९५० किलो दुग्धजन्य पदार्थ व खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच संबंधित डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून उत्पादन युनिट बंद करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या तपासात डेअरीमध्ये नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलाचा वापर करून ॲनालॉग पनीर तसेच गाईचे तूप तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. कारवाईदरम्यान २९९ किलो तूप, १९९ किलो क्रीम, १७४ किलो पनीर आणि २७८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल असा मोठा साठा जप्त करण्यात आला. या सर्व पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तपासादरम्यान अमोल दूध डेअरी शहरातील लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर, कामगार चौक आणि दर्गा रोडवरील श्रीराम चौक येथील तीन किरकोळ विक्री केंद्रांना पनीर व गाईच्या तुपाचा पुरवठा करत असल्याचेही समोर आले. त्यानंतर या तिन्ही दुकानांवरही धडक कारवाई करण्यात आली. या ठिकाणांहून गाईच्या तुपाचे अन्ननमुने घेण्यात आले असून ४१ किलो (₹२९,३०० किमतीचे) तूप जप्त करण्यात आले.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षां रोडे, कीर्तिका झाडे, प्रदन्या सुरसे, फरीद सिद्धिकी आणि योगेश चिभाडे यांनी सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली. संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेमुळे शहरातील भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या व्यवसायावर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*