छत्रपती संभाजीनगर : आई-वडिलांना अचानक भेटून सरप्राईज देण्यासाठी पुण्याहून जालन्याकडे निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वेरूळ परिसरातील नागपूर कॉरिडोरवर चॅनेल क्रमांक ४४९ जवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या सात वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

प्रतीक रामकिसन जगदाळे, त्यांची पत्नी श्रेया राजेंद्र पांडे आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा रुद्रांश अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे जगदाळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक जगदाळे यांच्या कुटुंबात त्यांच्या लहान भावाच्या विवाहाची तयारी सुरू होती. घरात लग्नाचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असताना आई-वडिलांना अचानक भेटण्यासाठी प्रतीक, त्यांची पत्नी आणि मुलगा कारने पुण्याहून जालन्याच्या दिशेने रवाना झाले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य असल्याचे या भीषण घटनेतून समोर आले.

पहाटेच्या वेळी कार समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ४४९ जवळ पोहोचली. त्यावेळी चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कारने पुढे जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की कारचा पुढील भाग ट्रकच्या मागील बाजूस घुसला आणि वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलिसांसह क्विक रिस्पॉन्स व्हेईकलच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यासाठी पत्रा कटरच्या साहाय्याने वाहन कापण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता.

लग्नाच्या आनंदाची तयारी सुरू असतानाच आलेल्या या दुर्दैवी घटनेने जगदाळे कुटुंबीयांसह नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

316 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क