मुंबई : राज्यातील 256 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. दुष्काळी परिस्थिती, पाणीपुरवठा तसेच शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरही विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीत विविध विभागांशी संबंधित एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातील प्रमुख निर्णय म्हणजे राज्यातील माजी अग्निवीरांना शासकीय सेवेत 10 टक्के समांतर आरक्षण देण्यास मंजुरी. चार वर्षांची लष्करी सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांना ‘गट-क’मधील गणवेशधारी सेवांच्या पदांवर या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यासाठी महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर करण्यात आले. जिल्हानिहाय चारा उत्पादन, सुधारित चारा पिके आणि उपलब्ध विविध स्रोतांचा वापर करून पशुपालन व दुग्धव्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न या धोरणातून केला जाणार आहे.
न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयासाठी 2,761 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र कारागृहे सुधारसेवा अधिनियम, 2025 मध्ये आवश्यक बदल करण्यासही मान्यता देण्यात आली.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बेला येथे 2 हेक्टर 37 आर शासकीय जमीन म्हाडाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी गरजू नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प उभारला जाणार आहे. पालघरमधील सूर्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींच्या फेरवाटपाचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला असून, 56 वर्षांनंतर संबंधितांच्या नावांची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यास मंजुरी देण्यात आली.
याशिवाय वांद्रे येथील जमिनीच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांची निर्मिती आणि वाळूज येथे दिवाणी न्यायालय व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण 2024 मध्येही बदल करण्यात आले असून, लॉजिस्टिक्स पार्कची जिल्हानिहाय कमाल संख्या मर्यादा हटविण्यात आली आहे. तसेच विविध झोननुसार मुद्रांक शुल्कात मोठी सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*