मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथे झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाचोड येथे दौरा केला. त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
ठाकरे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. “शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतलेला नाही. पूर्वीचे कृषिमंत्री या भागात फिरकले नाहीत आणि नवीन कृषिमंत्र्यांचे नावही राज्याला माहीत नाही,” असे त्यांनी सांगितले. तसेच, “शेतकऱ्यांना मदत करताना राजकारण करू नये,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाचोड परिसरातील गल्हाटी नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले आहे, ज्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी संजय नागोराव भुमरे पाटील यांच्या अडीच एकर जमीन वाहून गेली आहे. आदित्य ठाकरे यांनी शेतकरी राजेश शेठी व माणिक शेळके यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या शेतीतील कपाशीच्या नुकसानीची पाहणी केली.
शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. माणिक शेळके यांनी पाचोड ते अंबड रोडवरील पुलाची दुरुस्ती न झाल्यामुळे त्यांच्या शेतात दरवर्षी पाण्याचा प्रवेश होतो, असे सांगितले.
या दौऱ्यात तहसीलदार सारंग चव्हाण, शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्तात्रय गोर्डे, अॅड. बद्रीनारायण भुमरे, माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड, शिवसेना तालुका अध्यक्ष मनोज पेरे, संजय भुमरे, आनिस पटेल यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि अधिकारी उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*