Sarpanch-Water-Crisis-Protest-Aurangabad
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी गावातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर अनोखे आंदोलन केले. त्यांनी साडी नेसून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) कार्यालयाबाहेर निदर्शने केली. जलजीवन मिशनअंतर्गत गावात पाणीपुरवठ्याचे काम सुरू होऊन पाच वर्षे झाली, तरी अद्यापही महिलांना दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागते.
सरपंच मंगेश साबळे म्हणाले, “मी इथे सरपंच म्हणून नव्हे, तर गावातील महिलांचा आवाज म्हणून आलो आहे. महिलांना अजूनही दूरवरून पाणी आणावे लागते, हे दुर्दैवी आहे. 2021 पासून जलजीवन मिशनचे काम सुरू आहे, मात्र आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. टाकण्यात आलेले पाईपसुद्धा सडू लागले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिलांना ‘लाडकी बहीण’ म्हणतात, पण त्या बहिणींना अजूनही पाणी मिळत नाही. अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली का? चार-चार वर्षे झाली तरी काम अपूर्णच आहे.”
सरपंचांनी ठेकेदारांवरही टीका केली. “जर ठेकेदाराला काम पूर्ण करता येत नसेल, तर त्याने हे कंत्राट घेतलेच कशाला? आता तो बजेट मिळत नाही, असे सांगत आहे. केंद्र सरकारने 1 कोटी 80 लाख रुपयांची योजना दिली आहे, मग काम का थांबलं?”
उन्हाळ्यापूर्वीच अशी स्थिती असल्याने पुढील काळात परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती आहे. त्यामुळे सरपंच साबळे यांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*