maharashtra-kesari-referee-threatened

राज्यभर चर्चेत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचाची भूमिका बजावणारे शहरातील नितीश काबलिये (रा. बेगमपुरा) यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

रविवारी (३ फेब्रुवारी) अहिल्यानगर येथील वाडिया पार्क मैदानावर महाराष्ट्र केसरी किताबासाठी पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम सामना पार पडला. या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. मात्र, पंचांच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला. स्पर्धक महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांनी पंचांशी वाद घातला. उपांत्य सामन्यात शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारत शिवीगाळ केली होती, तर महेंद्र गायकवाडने देखील वाद घालून आक्षेपार्ह शब्द वापरले होते. यामुळे महाराष्ट्र कुस्ती परिषदेने कठोर भूमिका घेत गायकवाड आणि राक्षे यांच्यावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र कुस्ती परिषदेने पंचांच्या निर्णयाचे समर्थन केले. मात्र, सोशल मीडियावर पंचांबाबत नकारात्मक टिप्पण्या येऊ लागल्या. त्यानंतर अंतिम सामन्यात पंच असलेल्या नितीश काबलिये यांना अज्ञात व्यक्तीकडून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यामुळे त्यांनी तत्काळ बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.

या संदर्भात बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले की, “नितीश काबलिये यांनी पोलिस संरक्षणासाठी अर्ज दिला असून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल.”

हा प्रकार समोर आल्यानंतर कुस्ती क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र केसरीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पंचांवर अशा प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न होणे धक्कादायक असल्याचे मत कुस्ती प्रेमींनी व्यक्त केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

702 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क