reckless-driving-accident-shreynagar
छत्रपती संभाजीनगर: श्रेयनगर परिसरात सोमवारी (दि. १०) दुपारी टवाळखोरांच्या सुसाट कारने रस्त्यावर उभ्या कारला जोरदार धडक दिली. अपघाताच्या क्षणी कारमधील एअरबॅग उघडल्याने टवाळखोर बचावले, मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले. हा थरार पाहून अनेकांना धडकी भरली. या प्रकरणी ओम सचिन देवकर (वय १९, रा. चेतक घोड्याजवळ, जवाहर नगर) याच्यावर उस्मानपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल्डा कॉर्नर येथून भरधाव कार (एमएच २०, एफपी ६६४७) दुपारी तीनच्या सुमारास श्रेयनगरात आली. कारमध्ये तीन ते चार विशीतील युवक होते. श्रेयनगर ते ज्योतीनगर या अरुंद रस्त्यावर या युवकांनी चार ते पाच वेळा सुसाट वेगाने गाडी फिरवली. त्यांच्या धुमाकूळीमुळे नागरिक भयभीत झाले. वाहनाचा वेग पाहून नक्कीच मोठा अपघात होईल, असे नागरिकांना वाटत होते.
अखेर अपघात घडलाच. भरधाव वेगाने चालवलेल्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या बुंदाई व्हर्ना (एमएच २०, डीव्ही ६५७८) गाडीला जबर धडक दिली. जोरदार आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिक घाबरून अपघातस्थळी धावले. धडकेमुळे उभी कार १५ फूट फरफटत पुढे गेली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या नुकसानाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी या बेदरकार वाहनचालकांविरोधात कारवाईची मागणी केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कार चालक ओम सचिन देवकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*