गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : वाहतूक पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर येथील ओॲसीस चौकात घडली. चुकीच्या पार्किंगवरून कार बाजूला घेण्यास सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या व्यक्तीने तीन वाहतूक पोलिसांना लाकडी दांड्याने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी एजाज सय्यद मोहम्मद अली (वय ४४, रा. सलामपुरेनगर, पंढरपूर) याला अटक केली आहे.
मंगळवारी (२५ मार्च) सायंकाळी सुमारे सहा वाजता ओॲसीस चौकात वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस तैनात होते. एमएच ४३ एक्स ४०९३ क्रमांकाच्या कारच्या चुकीच्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी कार बाजूला घेण्यास सांगितले असता, वाहनचालक पोलिसांशी वाद घालू लागला.
अंमलदार सुधीर गाडगे यांनी वाहनचालकाचा फोटो काढण्यासाठी चलन मशीन बाहेर काढताच आरोपीने संतप्त होऊन पोलिसांच्या कॉलरला धरले. ही परिस्थिती पाहून चौकातील फौजदार शिंदे आणि हेडकॉन्स्टेबल थोरात मदतीसाठी धावून आले. मात्र, आरोपीने कारमधून लाकडी दांडा काढून गाडगे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. थोरात यांच्या पायावर जोरदार फटका मारला, तसेच फौजदार शिंदे यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ केली.
घटनेनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत एजाज सय्यद मोहम्मद अली याला अटक केली. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*