छत्रपती संभाजीनगर : एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाच्या बंद घरात चोरीसाठी आलेल्या चोरांचा कट अद्ययावत तंत्रज्ञानामुळे उधळला गेला. मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरांचा हालचालींचा अलर्ट थेट मालकाच्या मोबाईलवर गेल्याने तात्काळ प्रतिक्रिया देऊन चोरी रोखण्यात आली.
मनीष धारसीभाई परमार (रा. एन-३, सिडको) हे हॉटेल व्यावसायिक आपल्या कुटुंबासह २९ एप्रिल रोजी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत घराची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी घरासमोर मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते.
त्या रात्री सुमारे ९ वाजता परमार यांच्या मोबाइलवर हालचालींचा अलर्ट आला. तपासणी केली असता दोन चोरटे घराच्या भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश करत असल्याचे दिसून आले. ते कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत असतानाच परमार यांनी तात्काळ शेजारी व माजी नगरसेवक प्रमोद राठोड यांना संपर्क साधला. राठोड व इतर रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दी जमू लागल्याचे लक्षात येताच चोरांनी साहित्य फेकून दिले व ते रिकाम्या हाताने पळून गेले.
या प्रकाराची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार सुनील मस्के यांनी तपास सुरू केला आहे.
मोशन डिटेक्टर कॅमेरा – एक प्रभावी सुरक्षा उपाय
मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही कॅमेरे कोणतीही हालचाल झाली की रेकॉर्डिंग सुरू करतात व थेट मोबाइलवर अलर्ट पाठवतात. नाइट व्हिजन व AI तंत्रज्ञानामुळे अंधारातही हालचाली स्पष्ट दिसतात. मनुष्य व प्राणी यामधील फरक ओळखता येतो. यामुळे चोरीसारख्या घटनांवर वेळीच नियंत्रण ठेवता येते.
नागरिकांनीही अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्वतःच्या घराची सुरक्षा मजबूत करावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*