वैजापूर  : लाडगाव रस्त्यावरील घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय मुलाचे आयशर टेम्पोमधून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १०) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, पोलिसांनी तातडीने दाखल होत अवघ्या दोन तासांत मुलाची सुखरूप सुटका करत आरोपीला अटक केली.

बाजीराव भानुदास कांदळकर (वय ४५, रा. संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्याचे नाव असून, त्याला संवत्सर (ता. कोपरगाव) येथून पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून अपहृत बालकाची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी फुलारे या आपल्या पती, सासू, दीर, आई आणि तीन वर्षीय मुलगा कुणाल यांच्यासह लाडगाव रस्त्यावर वास्तव्यास आहेत. त्या मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी सायंकाळी कुणाल हा आजी लताबाई यांच्यासोबत घरासमोरील अंगणात खेळत होता. काही वेळासाठी लताबाई घरात गेल्यानंतर, टेम्पो (क्रमांक एमएच १४ बीजे ४१३२) थांबवत चालकाने मुलाला जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण केले.

घटनेनंतर घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एकाने मुलाला गाडीत टाकून नेल्याचे लक्षात येताच, फुलारे कुटुंबीयांनी तातडीने वैजापूर पोलीस ठाणे गाठले आणि माहिती दिली. पोलिसांनी संवत्सर येथील नातेवाईकांनाही खबर दिली.

पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करत आरोपीला अटक करण्यात आली आणि कुणाल याची सुखरूप सुटका झाली. मुलगा परत मिळाल्यानंतर आई-वडील, आजी व नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास घेत पोलिसांचे आभार मानले.

या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,413 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क