छत्रपती संभाजीनगर : शहरात बुधवारी (११ जून) सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांनी थैमान घातले. सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास आलेल्या या वादळामुळे शहरातील अनेक भागांत झाडे कोसळली, विजेच्या तारांवर प्रभाव पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. याच दरम्यान, सिद्धार्थ गार्डन येथे घडलेली दुर्घटना विशेषतः हृदयद्रावक ठरली.
गार्डनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या डोमजवळील भिंत जोरदार वाऱ्यामुळे अचानक कोसळली. या दुर्घटनेत स्वाती अमोल खैरनार (३७, रा. धामणगाव, जळगाव) आणि रेखा हरिभाऊ गायकवाड (६५, रा. गजानन नगर, हडको) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही महिलांचा मलब्याखाली अडकून जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. तिघेजण मलब्याखाली अडकल्याचे निदर्शनास आले. त्यातील शेख अखिल या युवकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित चार लहान मुलेही किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून त्यांच्या पालकांनी त्यांना घेऊन तात्काळ बाहेर काढले.
या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील इतर भागांमध्येही अनेक झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. विजेचा पुरवठा काही भागांत खंडित झाला असून महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे.
स्थानिक प्रशासनाकडून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*