छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक वादातून सासऱ्याला जोरात ढकलून दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात नेतो असे भासवत जावयाने सासऱ्याला तब्बल ५ ते ६ तास वाहनातच ठेवल्याने मृत्यू ओढवला. मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्याचे खोटे भासवत अखेर मृतदेहच घरी आणल्याचा प्रकार गुलमोहर कॉलनी, सिडको एन-५ भागात १ मे रोजी रात्री घडला. या प्रकारानंतर पोलिस तपासात सासऱ्याच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य उघड झाले असून जावई अखिलेश मुदीराज (३८, रा. साईकृपा अपार्टमेंट, नंदनवन कॉलनी) याला अटक करण्यात आली आहे.

मृत व्यक्तीचे नाव सुनीलकुमार चोप्रा (६८, रा. एन-५, गुलमोहर कॉलनी) असे आहे. त्यांच्या पत्नीचे नाव डॉली चोप्रा असून त्यांना दोन विवाहित मुली आहेत. मोठी मुलगी स्वाती हिचा विवाह सहा वर्षांपूर्वी अखिलेशसोबत झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून स्वाती हिचा पतीकडून शारीरिक आणि मानसिक त्रास सुरू असल्याने ती माहेरी राहत होती.

१ मे रोजी रात्री ९.३० वाजता अखिलेश सासरी गेला. तेथे त्याचे आणि पत्नी स्वातीचे वाद सुरू झाले. भांडण मिटवण्यासाठी सुनील व डॉली चोप्रा पुढे आले असता, संतप्त अखिलेशने सासऱ्याला जोरात धक्का दिला. त्यामुळे ते खाली पडून बेशुद्ध झाले. त्यावेळी त्यांच्या हृदयावर ताण आल्याची शक्यता डॉक्टरांनी नाकारलेली नाही.

यानंतर अखिलेशने चालकासोबत सुनील चोप्रा यांना कारमध्ये टाकून ‘उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात घेऊन जातो’ असे सांगितले. पत्नी डॉली आणि मुलगी स्वातीनेही त्याच्यावर विश्वास ठेवून निघून गेल्या. रुग्णालयात पोहोचलेल्या स्वातीला मात्र ‘तपासणी सुरू आहे, तू मुलांना घेऊन घरी जा,’ असे सांगत अखिलेशने तीला घरी परत पाठवले.

परंतु दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता अखिलेश थेट मृतदेह घरी घेऊन आला. यानंतर त्याने शवविच्छेदनालाही विरोध केला आणि वाद घातला. अखेर २ मे रोजी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारावर संशय आल्याने स्वाती हिने एमजीएम रुग्णालयात ४ जून रोजी लेखी अर्ज करून वडिलांच्या उपचारासंबंधी माहिती मागवली. यावर रुग्णालयाने उत्तर दिले की, ‘सुनीलकुमार चोप्रा नावाचा कोणताही रुग्ण १ मे रोजी दाखल झाला नाही’.

हा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर अखिलेशने उपचाराचा बनाव रचून सासऱ्याला गाडीतच ठेवले आणि त्यामुळेच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले. डॉली चोप्रा यांनी सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अखिलेशविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०४ (अ) अंतर्गत (सदोष मनुष्यवध) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अखिलेश हा व्यवसाय सल्लागार असून, त्याला न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे सिडकोचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले. पुढील तपास पीएसआय नाणेकर करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,924 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क