छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील साजापूर परिसरात NDPS पथकाने मोठी धडक कारवाई करत ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी संशयित रसायनांची पावडर व ड्रम्स जप्त केले. औषधांच्या स्क्रॅपचा वापर करून एमडीसारखा घातक अमली पदार्थ तयार केला जात असल्याचे या कारवाईतून समोर आले असून, यामुळे संपूर्ण संभाजीनगर हादरले आहे.
NDPS पथकाला माहिती मिळाली होती की, साजापूर गाव ते साजापूर चौफुली दरम्यान दोन आयशर गाड्यांमधून स्क्रॅपच्या नावाखाली रसायनांनी भरलेले ड्रम्स नेले जात आहेत, जे पुढे ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. त्या माहितीनुसार पोलिसांनी साजापूर चौफुली येथे सापळा रचत छापा मारला असता, दोन आयशर गाड्यांमधून स्क्रॅपच्या बॅरल्समध्ये लपवून ठेवलेली पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली.
यामध्ये अनुक्रमे 1 किलो 111 ग्रॅम व 401 ग्रॅम असा एकूण 1 किलो 512 ग्रॅम संशयित रसायन जप्त करण्यात आले. पुढील तपासात समोर आले की, हा सगळा साठा बबन खान (रा. साजापूर, MIDC वाळुंज) यांच्या गोडाऊनकडे जात होता. त्यानंतर पोलिसांनी त्या गोडाऊनवरही छापा टाकून आणखी 961 ग्रॅम पावडरसदृश्य रसायन जप्त केले.
पथकाने घटनास्थळी ड्रग्ज ओळखण्याची सरकारी चाचणी (Drug Identification Kit) केली असता, सदर पावडर ही अमली पदार्थ (MD) असल्याचे निष्पन्न झाले. एकूण कारवाईमध्ये 2 किलो 463 ग्रॅम एमडी, अंदाजे बाजारभाव 1 कोटी 23 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नमुन्यांची अधिकृत तपासणीसाठी FSL कडे पाठवणी करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे संभाजीनगर जिल्ह्यात औषधांच्या स्क्रॅपमधून ड्रग्ज तयार होणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, ड्रग्ज साखळीमधील इतर आरोपींचा शोधही सुरु आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*