छत्रपती संभाजीनगर :  “तू शेतकरी आहेस, आम्हाला स्वस्तात भाजी दे” असा दबाव टाकत तिघा अज्ञातांनी एका शेतकऱ्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याच्या खिशातून ५० हजार रुपये लुटण्यात आले असून, चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी करण्यात आले. हा प्रकार रविवारी (दि. २२) मध्यरात्री सव्वा एक ते दोन वाजेदरम्यान जाधववाडी मंडी परिसरात घडला.

प्रदीप गणपत जाधव (वय २८, रा. सफियाबादवाडी, शिऊर, ता. वैजापूर) हे आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी रात्री ते भाजीपाला खरेदीसाठी मोंढा मार्केट परिसरात आले होते. मंडीकडे जात असताना त्यांना मुख्य गेटजवळ तिघांनी अडवले. स्वस्तात भाजी मिळावी म्हणून त्यांनी दबाव टाकला. नकार मिळाल्यावर त्यांनी त्याच्या खिशातून ५० हजार रुपये जबरदस्तीने काढले.

त्यानंतर प्रदीप यांना मोपेडवर बसवून जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही अंतरावर जात असताना प्रदीप यांनी प्रसंगावधान राखत गाडीवरून उडी मारली व आरडाओरड केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूने बरगडीवर वार केला.

सुरक्षारक्षक धावून आले असता तिघे आरोपी घटनास्थळावरून ५० हजार रुपये घेऊन फरार झाले. जखमी अवस्थेत प्रदीप यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,104 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क