छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव पदावर कार्यरत असलेल्या हेमलता ठाकरे यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने विद्यापीठात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे समजते. दरम्यान, ठाकरे यांनी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले असून, त्यांच्या नावाने लिहिलेली दोन पानांची चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल चिठ्ठीमध्ये हेमलता ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, “इथे आल्यापासून आयुष्य धावपळीचे झाले. ऑफिसमधून होणाऱ्या छळामुळे जगण्याची इच्छा संपली आहे.” त्यांनी एका साहित्य चोरीच्या खोट्या आरोपाचा उल्लेख करत सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांत त्यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली. “मी नेहमी सत्य बोलले, पण या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे माझी सहनशक्ती संपली आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे.
चिठ्ठीत त्यांनी आपल्या आई, वडील, कुटुंबीय आणि विशेषतः ‘श्री’ या नावाने उल्लेख केलेल्या व्यक्तीकडे माफी मागत भावनिक संदेश दिला आहे. “आई, माझ्या श्रीची काळजी तू घेशील, त्याला माझी उणीव भासू देऊ नकोस,” असे त्यांनी लिहिले आहे.
या प्रकरणामुळे विद्यापीठ प्रशासनावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोनि मंगेश जगताप यांनी सांगितले की, पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अद्याप त्यांचा जबाब नोंदवलेला नाही. डॉक्टरांची परवानगी मिळाल्यानंतर पुढील तपास केला जाईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*