छत्रपती संभाजीनगर – प्लॉट दाखवतो असे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करून तिच्या हातातील ५० हजार रुपयांची पर्स हिसकावून रिक्षाचालकाने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १३ जुलै रोजी दुपारी आमखास मैदानाच्या मागील भागात घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिराबाई संजय दाभाडे (वय ४६, रा. अयोध्यानगर, एन ७, सिडको) या फिर्यादी आहेत. त्या घरकाम करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे पती सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतात. त्यांनी घरकुलासाठी साठवलेले ५० हजार रुपये घेऊन त्या १३ जुलै रोजी भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. शहागंज येथे त्यांची एक तोंडओळखीची महिला भेटली. बोलता बोलता एक रिक्षाचालक तेथे आला आणि हिराबाई यांना कुठे जायचे आहे, असे विचारले. त्यांनी आंबेडकर चौक सांगितले असता, त्याने रिक्षात बसवले.

संस्थान गणपतीजवळ थांबून चहा घेतल्यानंतर त्याने “प्लॉट घ्यायचा आहे का?” असे विचारले. हिराबाई यांनी नकार देऊनही त्याने आमखास मैदानाच्या मागे असलेल्या आरेफ कॉलनीत नेले. तेथे एकांत ठिकाणी जाऊन त्याने अचानक तिच्या हातातील पर्स हिसकावली आणि जीवे मारण्याची धमकी देत पळ काढला.

हिराबाई यांना रिक्षाचा क्रमांक आठवला नाही, मात्र त्यांनी आरोपीचे वर्णन पोलिसांना सांगितले आहे – तो जाडसर, सावळा, खाकी कपड्यात, डोक्यावर चॉकलेटी टोपी, लाल दाढी व लालसर डोळे, तसेच दातही लालसर रंगाचे होते. या प्रकरणाचा तपास हवालदार शिवाजी वाडेकर करीत आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,491 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क