छत्रपती संभाजीनगर : गारखेडा येथील शिकवणीसाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा कट नागरिकांच्या प्रसंगावधानाने आणि कार चालकाच्या धैर्यामुळे उधळला होता. चिमुकलीच्या आजोबाकडून तब्बल दीड कोटींची खंडणी उकळण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. पोलिसांच्या तातडीच्या कारवाईत दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, मास्टरमाईंड गणेश मोरे आणि बळीराम महाजन हे फरार आहेत.
ही घटना बुधवारी (१६ जुलै) संध्याकाळी घडली. औरंगपुरा परिसरात आजोबांकडे राहणारी मुलगी शिकवणीहून परत येत असताना चार अपहरणकर्त्यांनी बनावट क्रमांक (एमएच-२०-बीएन-२३००) असलेल्या सेंट्रो कारमध्ये तिचे अपहरण केले होते. कार चालक नवनाथ चेडेने धाडसाने पाठलाग केला, त्यावर आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. तरीही त्याने पोलिसांना कळवून पाठलाग सुरू ठेवला. शिवाजीनगरजवळ मुलीने हुशारीने पोलिसांचा १०० नंबर आरोपींना दिला आणि त्यानंतर नागरिकांच्या मदतीने वाईन शॉपजवळ कारवर दगडफेक करून मुलीची सुटका झाली होती. आरोपींनी मुलीला आणि कारला साराराजनगरजवळ सोडून पळ काढला.
तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, तसेच इंजिन व चेसिस नंबरच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. मास्टरमाईंड गणेश मोरे (पतसंस्थेत मॅनेजर, रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) याने दीड महिन्यापूर्वी जुनी सेंट्रो कार विकत घेऊन हा कट रचला होता. गणेशने काका बाबासाहेब मोरे (४२), संदीप ऊर्फ पप्पू पवार (३२, दोघेही रा. जामखेड, ता. अंबड), आणि बळीराम महाजन यांना कटात सामील केले. खराडी, पुणे येथेही याच टोळीने काही दिवसांपूर्वी अपहरणाचा प्रयत्न केला होता, मात्र तो फसला होता.
घटनेच्या गांभीर्याने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तीन तास ठाण मांडून तपासाचे मार्गदर्शन केले. गुन्हे शाखा, सायबर सेल, झोन-२ मधील डीबी पथकांच्या संयुक्त कारवाईत उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाने संदीप पवार आणि बाबासाहेब मोरे यांना अंबड-पाचोड रस्त्यावरील पिंपरखेड येथील हॉटेल लोकसेवा येथून रात्री ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सध्या गणेश मोरे आणि बळीराम महाजनचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. विशेष म्हणजे चारही आरोपी आणि चिमुकलीचे आजोबा हे एकाच गावचे असून, ओळखीचे होते. मोठ्या संपत्तीच्या लालसेपोटी या टोळीने हा कट रचल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध तीव्र करण्यात आला असून, लवकरच उर्वरित आरोपींना बेड्या पडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*