छत्रपती संभाजीनगर: सूतगिरणी चौक परिसरात बुधवारी (ता. १६) मध्यरात्री चार तरुणांनी पोलिसांच्या वाहनाला अडवून पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेले पोलिस कर्मचारी राहुल नरेश चावरिया (३८, रा. गांधीनगर) यांच्यावर सध्या दर्गा परिसरातील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
फिर्यादी चावरिया यांच्या तक्रारीनुसार, निरीक्षक भालेराव यांना तपासासाठी आष्टी (बीड) येथे घेऊन गेल्यानंतर रात्री स्नेहनगर एसआयडी ऑफिसमध्ये परतल्यानंतर ते भालेराव यांना घरी सोडण्यासाठी पोलिस वाहनाने जात होते. मध्यरात्री बाराच्या सुमारास सूतगिरणी चौक ते आनंदी हॉस्पिटल रस्त्यावर दोन दुचाकींवरील (एमएच २० एफडी ७६०५ सहित) चौघे तरुण पोलिस वाहनासमोर झिकझॅक करत गाडी चालवू लागले. पोलिस वाहनाचा अंबर दिवा सुरू असतानाही हा प्रकार सुरू राहिला.
यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत पोलिस वाहन अडवले. त्यापैकी एकाने वाहनाजवळ येत दरवाजा उघडला. चावरिया यांनी मोबाइलवर व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींपैकी एकाने फायटरने त्यांच्या डोळ्याखाली जोरदार वार केला. उर्वरित तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत डोक्यात वार केला. या हल्ल्यात चावरिया बेशुद्ध पडले आणि रुग्णालयात आल्यानंतरच शुद्धीवर आले.
हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*