छत्रपती संभाजीनगर: करमाड पोलीस ठाणे हद्दीतील हसनाबादवाडी परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या धंद्यावर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या मदतीने मोठी कारवाई केली. पोलिसांनी दिनेश लॉजिंग अँड बोर्डिंग हॉटेलवर छापा टाकत एका स्थानिक महिलेसह सहा आंतरराज्य महिलांची सुटका केली. तर हॉटेल मॅनेजरसह दोघांना अटक करून ९५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपविभागीय अधिकारी पूजा नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव, प्रताप नवघरे आणि स्वप्निल नरवडे यांच्या विशेष पथकाने ही मोहिम राबवली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार हसनाबादवाडी येथे हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समजताच पथकाने डमी ग्राहक तयार करून हॉटेलमध्ये पाठवला.
डमी ग्राहकाने हॉटेल मॅनेजर गणेश साळुंखे (वय २७, रा. अण्णाभाऊ साठे नगर, चिकलठाणा) याला शरीर संबंधासाठी महिलेची मागणी केली. त्यावेळी मॅनेजरने होकार देत पाचशे रुपये घेतले आणि ग्राहकाला पहिल्या मजल्यावरील १०५ क्रमांकाच्या खोलीत पाठवले. थोड्याच वेळात महिला खोलीत पोहोचल्यावर डमी ग्राहकाने गॅलरीत येऊन ठरल्याप्रमाणे पथकाला इशारा केला. तत्काळ पोलिसांनी छापा टाकत महिलांची सुटका केली.
या कारवाईत गणेश साळुंखे याच्यासह राजेश मगरे (वय २६, रा. देवगाव तांडा, ता. बदनापूर, जि. जालना) यांना अटक करण्यात आली. वेश्याव्यवसायाशी संबंधित ९५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून करमाड पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे हसनाबादवाडी परिसरातील अवैध धंद्यांवर धाक बसला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*