छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना आणि लातूर जिल्ह्यांतील सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागांमध्ये गेल्या १० वर्षांत तब्बल ३१ जणांना बनावट नियुक्तिपत्रांद्वारे शिपाई, चौकीदार आणि सफाई कामगार पदांवर नोकरी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण यांच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक अंकुश श्रीरंग हिवराळे आणि कनिष्ठ लिपिक उज्ज्वला अनिल नरवडे यांच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१५ ते २०२५ या कालावधीत आरोपींनी कार्यकारी अभियंत्यांच्या स्कॅन केलेल्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून खोटी नियुक्तिपत्रे जारी केली. विशेष म्हणजे, या ३१ उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराचे पालक सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला नव्हते. तरीदेखील लाड पागे समितीच्या शिफारशीवरून १६, अनुकंपा तत्त्वावर १२ आणि ३ जणांना सरळ सेवेत नियुक्त करण्यात आले. या नियुक्त्यांमध्ये कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नव्हती, अधिकृत भरती प्रक्रिया पार पडली नव्हती आणि नियमबाह्य पद्धतीने उमेदवारांना शासकीय सेवेत स्थान मिळाले.

१५ मे २०२५ रोजी तत्कालीन कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्या आदेशाने एस. बी. बिहारे यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने सर्व नियुक्त्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी वरिष्ठ लिपिक हिवाळे यांच्याकडे मूळ फाइल्स मागवल्या असता त्यांनी त्या सादर करण्यास नकार दिला. त्यांनी कार्यालयीन कपाट बंद ठेवून फाइल्स लपवल्या. अखेर पंचनामा करून कपाट उघडल्यावर संबंधित भरती प्रक्रियेच्या फाइल्स गायब असल्याचे समोर आले.

तपासणीत उमेदवारांनी शपथपत्राद्वारे कबुली देत, “आम्ही अर्ज केले नव्हते, आमचे नातेवाईक शासकीय सेवेत नव्हते आणि आम्ही नियुक्तीस पात्रही नव्हतो, मात्र आर्थिक व्यवहार करून नोकरी मिळवली,” असे स्पष्ट केले. तक्रारीतही आरोपींनी मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणातील बनावट स्वाक्षऱ्या, फाइल गायब होणे आणि आर्थिक गैरव्यवहार यांचा पोलिसांकडून तपास सुरू असून, लवकरच आणखी संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,160 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क