छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर परिसरात सोमवारी रात्री दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे खळबळ उडाली. पडेगाव येथील रामगोपालनगरमध्ये भरधाव टॅक्सीने समोरील कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर समोरील कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. धडक देणारी कार टॅक्सी पासिंगची असून तिच्यावर ‘भारत सरकार’ अशी पाटी लावलेली असल्याचे पाहून नागरिकांत संताप उसळला. शिवाय, त्या कारच्या चालकाच्या जागी बीअरची बाटली आढळल्याचा दावा स्थानिकांनी केला असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, त्याच रात्री नगर नाका परिसरात दुसरा गंभीर अपघात घडला. वाळूजच्या दिशेने जाणाऱ्या ५० वर्षीय दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक देऊन जागीच ठार केले. मृताची ओळख मुकेश चंद्रभान शिंगाडे (वय ५०, मूळ अमरावती) अशी झाली आहे. ते बीएसएनएलमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते. अलीकडेच त्यांची शहरात बदली झाल्याने ते पत्नी, मुलगा व मुलीसह तार भवन येथील शासकीय निवासस्थानात राहत होते. सोमवारी कार्यालयीन काम पूर्ण करून सायंकाळी घरी परतल्यानंतर रात्री १० वाजता ते दुचाकी (एमएच २७ बीसी ४४३३) घेऊन वाळूजच्या दिशेने निघाले. रात्री ११ वाजताच्या सुमारास नगर नाका परिसरात सुसाट वेगाने आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली आणि चालक पसार झाला. धडकेत शिंगाडे दूरवर फेकले जाऊन रस्त्यावर कोसळले. त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, वाहतूक सुरळीत केली आणि अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे. दोन्ही अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांनी वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*