छत्रपती संभाजीनगर : शहरात शिक्षणासाठी आलेल्या डी. फार्मसीच्या तिसऱ्या सत्रात शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना एन-७ परिसरातील ग्रिव्हिल कॉलनीमध्ये घडली आहे. कल्याणी परमेश्वर वायाळ (वय २१, रा. पिंपरखेड, ता. मंठा, जि. जालना) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. बुधवारी (दि. ३० जुलै) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

कल्याणी ही जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील असून साई इन्स्टिट्यूटमध्ये डी. फार्मसीचे शिक्षण घेत होती. काही महिन्यांपूर्वीच ती शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आली होती. शहरातील ग्रिव्हिल कॉलनीतील भाड्याच्या घरात वर्गमैत्रिणींसोबत राहत होती. बुधवारी सकाळी मैत्रिणींनी एकत्र स्वयंपाक करून महाविद्यालयात गेल्या. मात्र, कल्याणी घरीच थांबली होती.

दुपारी महाविद्यालयातून परतलेल्या मैत्रिणींनी दरवाजा ठोठावला, पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, कल्याणीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने दरवाजा उघडून कल्याणीला खाली उतरवले आणि घाटी रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

खास बाब म्हणजे, पोलिसांनी घटनास्थळी तपास करताना कल्याणीचा मोबाईल समोरच्या फळीवर ‘रेकॉर्डिंग पोझिशन’मध्ये उभा असल्याचे आढळून आले. त्यामुळे व्हिडीओ रेकॉर्डिंग किंवा व्हिडीओ कॉल सुरू होता का? याचा तपास फॉरेन्सिक माध्यमातून केला जात आहे. सध्या मोबाईल लॉक असून तपासानंतरच अधिक माहिती स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

कल्याणी अभ्यासू आणि स्वावलंबी होती. शिक्षणाबरोबरच सिडको परिसरातील एका मेडिकल दुकानात अनुभवासाठी ती नोकरी करत होती. तिच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,244 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क