छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात गुरुवारी (दि. २८) दुपारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस तब्बल दोन तास अविरत कोसळला. अचानक झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले. सखल भागांत मोठी तळी साचल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली तर व्यापाऱ्यांचीही त्रेधातिरपीट उडाली.

एमजीएम वेधशाळेनुसार शहरात अवघ्या दोन तासांत तब्बल ४० मिमी पावसाची नोंद झाली. पडेगावात ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसानंतर शहरातील कमाल तापमान २८.४ अंश सेल्सिअस व किमान २२.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

अचानक झालेल्या या पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ जलमय झाले. अनेक ठिकाणी चारचाकी आणि दुचाकी वाहनांना पाण्यातून मार्ग काढताना अक्षरशः पोहावे लागले. पादचाऱ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागला. दुकानांसमोर आणि गाळ्यांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या. विशेषतः सखल भागातील तळघरांत पाणी घुसल्याची नोंद झाली आहे.

शहरातील खडकेश्वर मनपा वाचनालयासमोर, श्रेयनगरमधील शुभम सोसायटी, तसेच बन्सीलालनगर येथील म्हाडा कॉलनीत झाडे उन्मळून पडली. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत हटवण्याचे काम करावे लागले. दशमेशनगर येथील महादेव मंदिर परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही भागांत वीज पुरवठाही खंडित झाला होता.

सातारा परिसर, उखणपूल, एमआयटी परिसर, कैलासनगर, मोंढा, मारुती मंदिर, औषधी भवन, गोमटेश मार्केट, औरंगपुरा भाजीबाजार तसेच पैठण रोड, गोलवाडी, इटखेडा, कांचनवाडी येथील रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, हवामान खात्याने आज (शुक्रवार) आणि पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

818 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क