छत्रपती संभाजीनगर : हृदय पिळवटून टाकणारी घटना पुंडलिकनगर परिसरात घडली आहे. आईनेच जन्मानंतर काही तासांचे निरागस बाळ पोत्यात भरून डिव्हायडरवरील कचऱ्यात फेकून दिलं. त्या क्षणी कोणीच नव्हतं, फक्त थंडगार रात्र, कुत्र्यांचे डरकाळी देणारे आवाज आणि एका नवजात जीवाचं नशिब. पण देवाच्या दैवी खेळानं, मृत्यूच्या दाढेतूनही हे बाळ वाचलं.

पहाटे सुमारास पाच वाजता मोकाट कुत्र्यांनी कचऱ्यातून पोत ओढून रस्त्यावर आणलं. त्यांच्या दातांनी बाळाच्या कोवळ्या छातीवर जखमा केल्या. रडत-तडफडत ते बाळ जिवाशी झुंज देत होतं. इतक्यात एक बस त्या रस्त्याने धावून गेली. कुत्रे पळून गेले, पण पोत रस्त्यातच पडलेलं. बसच्या दोन चाकांमध्ये ते पोत आलं, गाडी त्यावरून गेली… आणि तरीही त्या बाळाचा श्वास चालू राहिला! जणू मृत्यूनेही त्या देवदूतास स्पर्श केला नाही.

गावाकडून परतत असलेले भागेश पुसदेकर यांनी ही हालचाल पाहिली. पोताजवळ कुत्रे पळत होते, पण त्यांच्या कानावर एक वेगळा आवाज आला – रडण्याचा! त्यांनी नागरिकांना बोलावलं. पोत उघडलं, आणि आत दिसलं – रक्ताळलेलं, जखमी बाळ… तरीही डोळ्यांत जगण्याची आस. एक क्षण अंगावर काटा आला. त्यांनी घाईघाईनं बाळाला उचललं आणि रुग्णालयात धाव घेतली.

आईचं हृदय एवढं कठोर कसं झालं?

तपासात धक्कादायक गोष्ट समोर आली. मूळ वाशिम जिल्ह्यातील २४ वर्षीय तरुणीचा घटस्फोट झाला होता. छत्रपती संभाजीनगरातील खासगी कंपनीत ती नोकरी करत होती. एका तरुणाशी ओळख झाली, आणि तिची गर्भधारणा झाली. घरच्यांना कळू नये म्हणून तिने गावी न जाता गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास एकटीनेच प्रसूती केली. आणि मग? त्या छोट्याशा जीवाला पोत्यात भरलं, थंड रात्रीत कचऱ्यात फेकलं… जिथे फक्त कुत्रे आणि मृत्यू उभा होता.

सीसीटीव्हीने पकडलं सत्य

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. एका महिलेची अस्पष्ट छबी दिसली, पण तिच्या उंच टाचेच्या चपलेवरून तपास पुढे गेला. १५० महिलांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिच्या अपार्टमेंटमध्ये चपलांची जोडी शोधली. सुरुवातीला तिने नकार दिला, पण फुटेज पाहताच तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले… आणि तिने कबुली दिली.

बाळ जिवंत आहे… देवाचा आशीर्वाद!

घाटी रुग्णालयात सध्या हे बाळ उपचार घेत आहे. अंगावर जखमा आहेत, कुत्र्यांच्या दातांच्या खुणाही आहेत. डॉक्टरांनी रेबीज इंजेक्शन दिलं आहे. “बाळाचं वजन चांगलं आहे, प्रकृती स्थिर आहे, दोन-तीन दिवसांत सुधारणा होईल,” असं बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी सांगितलं.

या घटनेनंतर प्रत्येकाचा हृदय प्रश्न विचारत आहे – एका आईचं मन एवढं कठोर कसं झालं? आणि त्याचवेळी एक गोष्ट स्पष्ट होते – जेव्हा देव जपतो, तेव्हा मृत्यूही मागे सरतो. हा देवदूत वाचला, आणि तीच खरी आशेची किरण आहे!

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,388 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क