छत्रपती संभाजीनगर : शहरातील देवळाई रोड परिसरात रविवारी (दि.३१) मध्यरात्री मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. कौसर पार्कजवळील रॉयल सुपर मार्केट या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरांच्या टोळीने तब्बल ३८० किलो ड्रायफ्रूट आणि रोख रक्कम असा चार लाखांचा ऐवज लंपास केला. या धाडसी चोरीने परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी मोहम्मद जाकीर ठेकिया (वय ४१, रा. हुसेन कॉलनी) यांचे रॉयल सुपर मार्केट नावाचे दुकान देवळाई रोडवर आहे. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री त्यांनी दुकान बंद करून घरी प्रस्थान केले होते. मध्यरात्री कारमधून आलेल्या चोरट्यांनी अवघ्या २५ मिनिटांत चोरीची घटना घडवून पसार झाले. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
चोरट्यांनी दुकानातून तब्बल ५० किलो बदाम, ७५ किलो काजू, ५० किलो अंजीर, ५० किलो पिस्ता, २० किलो मखाना, १०० किलो मनुका, १० किलो अक्रोड, २५ किलो खजूर आणि १५ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशीदरम्यान समोर आले की, चार ते पाच चोरट्यांनी ही घटना घडवली. एकाने प्रथम बाहेरचा दिवा फोडला, तर दुसऱ्याने लोखंडी पहारीने शटर उचकटले. आत शिरल्यानंतर साहित्य चोरून ते पसार झाले. मात्र चोरीदरम्यान एका चोरट्याचा मोबाईल दुकानात राहिला. तो मोबाईल घेण्यासाठी तो पुन्हा दुकानात परत आला होता. याशिवाय एक स्क्रू ड्रायवरही पोलिसांच्या हाती लागला आहे.
या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोबाईलच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*