वैजापूर : तालुक्यातील खंडाळा परिसरातील रमाईनगर भागात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. वैजापूरमधील कदम स्कूल ऑफ जेएनएम नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या पायल सुधाकर गोतीस (वय २०) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी पायलचे आई-वडील कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरला गेले होते. पायल घरी एकटीच होती. याच दरम्यान तिने आई-वडिलांना फोन करून ते कधी परत येणार आहेत असे विचारले होते. दुपारी आई-वडील परतल्यानंतर त्यांनी मुलीला पाणी मागितले. मात्र घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. त्यावेळी पायलने ओढणीच्या साहाय्याने छताला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले.
हे पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने पायलला खाली उतरवून वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कायम आनंदी स्वभावाची पायल हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजलेले नाही.
पायलच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केल्यानंतर खंडाळा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गोतीस कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आत्महत्येचे ठोस कारण समोर आलेले नाही. तथापि या घटनेने विद्यार्थ्यांमधील मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*