छत्रपती संभाजीनगर : शहरातील कुख्यात गुंड जावेद ऊर्फ टिप्या याच्या गारखेडा भागातील दहशतीला अंकुश घालण्यासाठी पुंडलिकनगर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. न्यायालयात शरण आल्यानंतर हर्सल कारागृहातून सुटलेल्या टिप्याला (दि.९) पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी गारखेडा परिसरातील गल्ल्यांमधून त्याची हातकड्यांसह धिंड काढत पोलिसांनी नागरिकांसमोर गुन्हेगारीला चाप लावल्याचा संदेश दिला.

महिनाभरापासून फरार असलेल्या टिप्याने नुकतेच बायपास रोडवर व्यापाऱ्याला तलवार लावून दोन लाखांची रोकड लुटली होती. त्याच्या टोळीतील चार गुंडांना पोलिसांनी याआधीच पकडले होते; मात्र टिप्या न्यायालयात शरण आला होता. त्याच्यावर खून, दरोडा, अपहरण, लूटमार, जीवघेणे हल्ले यांसह मोक्का व एमपीडीए अंतर्गत कारवाई झालेली आहे. तरीही तो सुधारत नसल्याने पोलिसांनी या वेळी गारखेडा भागात गल्लोगल्ली फिरवत त्याला लोकांसमोर आणले. या कारवाईत पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, एपीआय शिवप्रसाद कहऱ्हाळे, उपनिरीक्षक विनोद भालेराव, कोळेकर, अंमलदार वाघ, विजय लकवाल, निकम, राठोड, देवकर यांनी सहभाग घेतला.

धिंड काढताना परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊन ही कारवाई पाहिली. मात्र टिप्याच्या चेहऱ्यावर अजूनही माज कायम असल्याचे चित्र दिसले. धिंड काढताना साईनगर कमानीजवळ टिप्याची बहिणही पोहोचली. तिने पोलिसांसमोरच नागरिकांना दमदाटी करून शिवीगाळ सुरू केली. एका किराणा दुकानाचे शटर तिने जबरदस्तीने बंद केले. पोलिसांनी तिला वारंवार समज दिली तरीही ती ऐकण्यास तयार नव्हती. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

पोलिसांनी पंचनामा करून टिप्याकडून एक दुचाकी व पॅन्ट असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानंतर रात्रीच पुंडलिकनगर पोलिसांनी टिप्याच्या बहिणीवर अदखलपात्र गुन्हा नोंद केला. गुन्हेगारीला चाप लावण्याबरोबरच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. गारखेडा भागात टिप्याच्या दहशतीला पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईनंतर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,366 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क