छत्रपती संभाजीनगर : लष्करी गणवेश घालून स्वतःला कॅप्टन म्हणून मिरवणाऱ्या एका महिलेवर दौलताबाद पोलिसांनी कारवाई करून तिला ताब्यात घेतले आहे. रुचिका अजित जैन (वय ४८, रा. धरमपूर) असे तिचे नाव असून, तिने अनेक संस्थांमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत जाऊन नागरिकांची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रुचिका जैन लष्कराचा गणवेश वापरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला. तपासात दोन प्रकारचे लष्करी गणवेश, कॅप्टन रँकचे तीन स्टार, ‘स्पेशल फोर्स’ लिहिलेली दंडपट्टी, कॉम्बॅक्ट टोपी, लष्करी बूट, नेमप्लेटसह दोन गणवेश, ‘डेबोनार सेक्युरिटी पिपल’ असे लिहिलेले बनावट ओळखपत्र, लष्करी गणवेशातील तिचे फोटो असलेले फ्रेम, विविध संस्थांकडून मिळालेली सन्मानचिन्हे, पुरस्कार, निमंत्रणपत्रिका, टॉय एअर पिस्तूल, रायफल तसेच वॉर मेमोरियलचे फोटो व साहित्य असा मोठा साठा जप्त करण्यात आला.

रुचिका जैन स्वतःला कॅप्टन म्हणून सादर करून अनेक अकादमी, संस्था आणि समारंभात पाहुणी म्हणून सहभागी होत होती. नागरिकांना ती लष्करी अधिकारी असल्याचा विश्वास देत होती. याप्रकरणी पोलिस अंमलदार महेश घुगे यांच्या तक्रारीवरून कलम १६८ (भा.दं.वि.) अंतर्गत दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पीए-सआय बोडखे करत आहेत.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मूळची उत्तरप्रदेशातील असलेल्या रुचिकाने काही वर्षांत धरमपूर परिसरात गाडी-बंगला असे प्रस्थ निर्माण केले. ती पूजापाठ करत असल्याने तिच्याकडे अनेक भक्त यायचे. नंतर तिने लष्करी अधिकाऱ्याचा गणवेश व्हिडिओ पाहून शिवून घेतला आणि स्वतःला कॅप्टन म्हणून सादर करू लागली.

पुण्यातील दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स विभागाला रुचिकाबद्दल माहिती मिळाल्यानंतर तिच्यावर काही महिन्यांपासून नजर ठेवण्यात येत होती. ती स्वतःला पॅराशूट रेजिमेंटची गुप्तचर अधिकारी असल्याचे सांगून गुप्त मोहिमेवर असल्याचा दावा करत होती. अखेर दौलताबाद पोलिस आणि दक्षिण कमांडच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून तिच्या घरी छापा मारून साहित्य जप्त केले.

रुचिका जैनने आर्थिक फायद्यासाठी देवीचे मंदिर बांधून ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. तिच्या या बनावट कृत्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,804 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क