छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेने परिसर हादरला. तीन मित्र दारू पिण्यासाठी शेतात बसले असता वादातून दोन जणांनी तिसऱ्या मित्रावर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडून त्याचा खून केला. पोलिसांनी तत्पर कारवाई करत एका आरोपीस अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राहुल रमेश नवथर (३५, रा. गळनिंब, ता. गंगापूर) सोमवारी दुपारी कानिफनाथ मावस आणि योगेश कल्याण नागे (दोघेही रा. भिवधानोरा) यांच्यासोबत भिवधानोरा शिवारातील गट क्रमांक ३०६ मधील शेतात दारू पिण्यास बसला होता. दारूच्या नशेत त्यांच्यात जोरदार वाद झाला. याच वादातून मावस व नागे यांनी गावठी कट्ट्याचा वापर करत राहुलवर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी बरगडीत, दुसरी खांद्यावर तर तिसरी पोटात लागल्याने राहुल जागीच मृत्युमुखी पडला. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस, ठसे तज्ज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. पुरावे जतन करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. याप्रकरणी मृत राहुलचा भाऊ महेश नवथर यांनी फिर्याद दिल्यानंतर दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास पुण्याकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी योगेश नागे यास नेवासा फाटा (अहिल्यानगर जिल्हा) येथे अटक केली. तर मुख्य आरोपी कानिफनाथ मावस हा फरार असून त्याने मोबाईल बंद केल्याने त्याचे लोकेशन मिळण्यात अडचणी येत आहेत. पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला आहे.

या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वर्चस्ववादातून ही हत्या झाल्याची चर्चा गावात रंगली आहे. गंगापूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,599 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क